मुंबई - सध्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. फळ पिकायला सुरुवात झाली आहे. परंतु मालाला उठाव नाही, अशी अवस्था बागायतदारांची झाली आहे. कोरोनामुळे वाहतूकही ठप्प आहे. म्हणूनच हापूस आंब्याला अच्छे दिन येण्यासाठी जनता दलाने एक सूचना राज्य सरकारकडे मांडली आहे. सध्या एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा आंबा वाहतुकीसाठी उपयोग करावा, अशी आग्रही मागणी जनता दलाने राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
आंबा झाडावर तयार होऊन खाली पडू लागला आहे. दरात प्रचंड घसरण झाली आहे. यामुळे बागायतदार अस्वस्थ झाला आहे. आंबा तातडीने बाजारात येणे आवश्यक आहे. वाहतुकीची व्यवस्था न झाल्यास नुकसान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सध्या एसटी बसचा यासाठी वापर करावा, अशी मागणी जनता दलाने केली आहे. ही माहिती जनता दल सेक्युलरचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
एसटीतील सीट काढा -
एसटी बसमधील सीट काढावी. त्यामुळे मोठ्या संख्येने आंब्यांच्या पेट्यांची त्यातून वाहतूक होऊ शकेल, असेही जनता दलाच्या वतीने सांगण्यात आले. वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करू देण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलिम भाटी यांनी राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.