मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' घराबाहेर काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडीमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या, धमकीचे पत्र व काही बनावट नंबर प्लेट आढळल्या आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांचा क्राईम ब्रांच विभाग तपास करत आहे. दरम्यान या घटनेची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या गाडीची जबाबदारी जैश-उल्-हिंद या संघटनेने स्वीकारल्याचा दावा करणारे एक पत्र फिरत आहे. 'मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जी स्कॉर्पिओ गाडी सोडण्यात आली होती, ती आमच्या संघटनेकडून सोडण्यात आली होती. हा फक्त ट्रेलर असून यापुढेही अशा प्रकारची घटना घडू शकते,' असे या पत्रामध्ये देण्यात आली आहे. या बरोबरच जर मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना त्यांच्या मुलांच्या जीवाची काळजी असेल तर त्यांनी एक रक्कम सांगितल्याप्रमाणे द्यावी, अशी धमकीही या पत्रामध्ये दिली आहे.
मुंबई पोलिसांची 'नो कमेंट' -
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पात्राची विश्वासार्हता किती आहे याचा अंदाज अद्याप मुंबई पोलिसांना आलेला नाही. मुंबई पोलिसांनी या संदर्भात तपास करत असताना एका व्यक्तीची ओळख पटवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, जबाबदारी स्वीकारलेल्या पत्राबद्दल मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता मुंबई पोलिसांकडून यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.
जिलेटीनच्या कांड्यांचा कमर्शियल ग्रेड वापरासाठी -
ज्या जिलेटीनच्या कांड्या मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडल्या आहेत, त्या अडीच किलो वजनाच्या आहेत. यांचा वापर मिलिटरी ग्रेट जिलेटिन म्हणून करता येत नाही. कमर्शिअल ग्रेडसाठी या जिलेटिन कांड्या वापरल्या जातात, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्या गाडीचा मालक हिरेन हसमुख मनसुख याचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. 17 फेब्रुवारी रोजी ही गाडी चोरीला गेल्यानंतर 18 फेब्रुवारीला हिरेन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवलेली होती.