मुंबई - विदेशी चातक पक्षी आला की पावसाचे संकेत मानले जातात. सध्या मुंबईत हे पक्षी दाखल होत आहेत. मात्र, अतिउष्णतेने हे पक्षी जखमी होत आहेत. असे ४ पक्षी मुंबईसह ठाण्यात आढळून आले आहे. त्यांना सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले.
पाऊस येण्याचा अंदाज देणारे चातक मुंबईत दाखल होत आहेत. मुंबई महालक्ष्मी, पेडर रोड, भांडूप, ठाण्यातील लोकमान्यनगर या परिसरात हे पक्षी आढळून आले. मात्र, उष्णतेमुळे ते जखमी झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लँट अँड अॅनिमल वेल्फेयर सोसायटी (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) या संस्थांना माहिती दिली. या संस्थेचे स्वयंसेवक निशा कुंजू, हसमुख वळूंज आणि हितेश यादव हे घटनास्थळी पोहोचले. पशू चिकित्सक डॉ. राहुल मेश्राम यांनी चारही पक्ष्यांवर उपचार केले. त्यांना काही वेळ देखरेखीखाली ठेवून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक आणि पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी दिली. आपल्याला असे कुठलेही पक्षी आढळून आले, तर पॉज-मुंबई एसीएफ हेल्पलाईन क्रमांक ९८३३४८०३८८ किंवा वन विभाग नियंत्रण कक्षाशी १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चातक पक्ष्यालाच जॅकोबीन कुक्कू म्हणतात. हे पक्षी दक्षिण आफ्रिकेतून १५ ते ३० मेच्या दरम्यान प्रवास करत भारतात येतात. हे पक्षी स्वतः आपली घरटी तयार करत नाही. इतरांच्या घरट्यांमध्ये अंडी देतात, असे पक्षीतज्ज्ञ संजोय मोंगा यांनी सांगितले.