मुंबई - राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकीही गेली आहे. त्यावर आता विविध नेते आणि पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी आज संसदेने रद्द केली. महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर, यामुळे लोकशाहीचे हत्याकांड झाल्याचे सांगत केंद्राच्या निर्णयावर घणाघाती टीका केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिला आहे. त्यानंतर संसदेने त्यांची खासदारकीही रद्द केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीने सभात्याग करत तीव्र शब्दात याचा निषेध केला. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी आमदारांनी जोरदार घोषणा दिल्या. संसदेच्या निर्णयाचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदेच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी अखेर संसदेतून रद्द करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. दुसरीकडे चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे फिरत आहेत. परंतु, राहुल गांधी यांना तर आता शिक्षा ठोठावली गेली आहे. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांडच असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली काम आहेत, असा थेट आरोपही ठाकरे यांनी केला. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात झाली असून फक्त लढाईला दिशा द्यावी लागणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी पक्षावर अलिकडच्या काळात यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप नेहमीचाच झाला आहे. तसेच यातून सत्ताधारी आणि विरोधकांचा टोकाचा संघर्ष होत असल्याचे दिसत आहे. संसदेच्या बाहेरच नाही तर संसदेमध्येही याचा अनुभूती नित्याचीच झाली आहे. पूर्वी किमान सत्ताधारी पक्ष तरी संसद चालवत होता. आता तर विरोधकांच्या बरोबर सत्ताधारीही निदर्शने आणि आंदोलने करत असल्याचे अधिवेशन काळात दिसून येत आहे. त्यातून संघर्ष वाढत आहे.