मुंबई Israel Hamas Conflict : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलं होतं. या प्रकरणी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना 'हमास'कडून लढण्यासाठी पॅलेस्टाईनला पाठवावी, अशी खोचक टीका हिमंता बिस्वा सरमा यांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पियूष गोयल आणि हिमंता बिस्वा सरमा यांनी माफी मागावी, अशी मागणी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.
काय आहे प्रकरण : शरद पवार यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलं होतं. पॅलेस्टाईन आणि इस्राईल युद्ध हे पॅलेस्टाईनच्या भूमीवर सुरू असल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. इस्रायलनं अगोदर पॅलेस्टाईनच्या भूमीवर आक्रमण केलं, त्यानंतर इस्रायलची निर्मिती झाल्याचा दावाही शरद पवार यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांच्यावर केद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाईनच्या अध्यक्षांना फोन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना फोन करुन शोक व्यक्त केल्याचं ट्विट केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा इथं झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर भारताच्या तात्त्विक भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला. गाझामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांना भारत मदत पाठवत राहील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
पंतप्रधानांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना फोन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत चर्चा केल्यानं राष्ट्रवादीची भूमिका योग्य होती, याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ता क्लाइड क्रास्टो यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :