मुंबई : देशभरात कोरोनाचे सावट असताना कौन्सिल फार द स्कूल सर्टीफिकेट एक्झॅमिनेशनने (सीआयसीएसई) मंडळाने दहावी-बारावीचा निकाल आज(शुक्रवार) जाहीर केला आहे. यंदा दहावीचा निकाल 99.34 टक्के तर बारावीचा निकाल 96.84 टक्के इतका आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही मंडळाने यंदा जाहीर केली नाही. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात थोडी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
देशात सीआयसीएसई मंडळाने दहावी आणि बारावीच्या ऑनलाईन निकाल जाहीर केला. देशभरातून 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, 1 हजार 377 विद्यार्थी नापास झाले आहेत. बारावीची परीक्षा 85 हजार 611 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी 2 हजार 798 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर, 82 हजार 813 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सीआयसीएसई मंडळाचा राज्याचा दहावीचा निकाल 99.92 टक्के तर बारावीचा निकाल 98.53 टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल वाढला आहे. तर, राज्याच्या बारावीच्या निकालात घट झाली आहे. गेल्यावर्षीचा दहावी, बारावीचा निकाल अनुक्रमे 99.85 टक्के आणि 99.27 टक्के इतका लागला होता. कोरोना संकटामुळे या मंडळाच्या बारावीच्या 8 तर दहावीच्या 6 विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या विषयांचे मूल्यांकन परीक्षा झालेल्या विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात आले. या निकाल पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास अशा विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.