मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालयाचे पाडकाम केले. परब यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबत भूमिका स्पष्ट केली. सन १९६० मध्ये म्हाडाच्या बिल्डिंग तयार झाल्या. येथील मी रहिवाशी आहे. माझे बालपण तसेच राजकीय कारकीर्द येथेच घडली. आजवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्यांनी केला.
वारंवार म्हाडावर दबाव: आज आमदार, माजी मंत्री म्हणून नव्हे तर एक रहिवाशी म्हणून बोलत आहे. म्हाडाच्या जागा आता सोसायटीच्या ताब्यात आहे. येथील रहिवाशांनी सांगितल्यामुळे येथे कार्यालय सुरु केले. परंतु, सोमय्यांनी माझे कार्यालय अनधिकृत असल्याचे भासवत कारवाईची मागणी सातत्याने करत आहेत. सोसायटी मधील रहिवाशांनी परवानगी मागितली. सोमय्यांनी वारंवार म्हाडावर दबाव टाकला, असा गंभीर आरोप परब यांनी केला. तसेच म्हाडाने सोसायटी अधिकृत करण्यास नकार दिल्यानंतर कार्यालयाचे पाडकाम केल्याचे परब यांनी सांगितले.
रहिवाशांच्या मनात भीती : मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. त्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. सध्या येथे थोड्याशा अधिकच्या जागेवर गरीबांनी आपली घरे वाढवली आहेत. मात्र, बिल्डरांनी केवळ २२० स्क्वेअर फूट नागरिकांना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमय्यांनी या अधिकच्या जागेवर आक्षेप घेऊन बिल्डर धार्जिणे भूमिका घेतली आहे. ५६ वसाहतींमधील रहिवाशांच्या मनात यामुळे भीती निर्माण झाली आहे. सोमय्या बिल्डरांकडून सुपारी घेऊन आरोप करत आहेत. माझ्यावर ही भाजप सोमय्यांमार्फत दबाव टाकत आहे. आता म्हाडाची जागा पाहण्यासाठी सोमय्या येत आहेत.
परब यांना खुले आव्हान: सोमय्या म्हाडा अधिकारी आहे की, मुकादम आहे. तो कोण पाहणी करायला येणारा, असा सवाल उपस्थित केला. आजवर काहीच बोललो नाही. पण मी एक शिवसैनिक आहे. सोमय्यांनी पाहणी करायला पाठवा, असे पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी जरुर यावे, आम्ही शिवसैनिक शिवसेना स्टाईल सोमय्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत, असे खुले आव्हान परब यांनी दिले. दरम्यान, गरिबांच्या घराचे नुकसान होत असेल तर रस्त्यावर उतरणार आहोत. अनुचित प्रकार घडल्यास सोमय्या आणि भाजपची जबाबदारी असेल, असा इशारा दिला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी सोमय्या का गेले नाहीत, असा सवाल केला.
पोलिसांनी सोमय्यांची गाडी अडवली: सोमय्या दुपारी 12.30 वाजता वांद्रे येथील अनिल परबांच्या पाडकाम केलेल्या कार्यालयाला भेट देणार होते. त्यासाठी सोमय्या घरातून निघाले. मात्र, अनिल परब यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वांद्रे येथील संबंधीत म्हाडाच्या वसाहतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी सोमय्यांची गाडी बीकेसी येथे अडवली. दरम्यान, गाडी अडवल्यामुळे सोमय्या संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर पोलिसांनी मनधरणी करत, सोमय्यांना वांद्रे येथे जाण्यापासून रोखले.