मुंबई - कोरोना महामारी काळात मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाबरोबरच राज्यातील 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी महत्वाची भूमिका बजावली. कठीण काळात त्यांनी कोविड रुग्णांना सेवा दिली. मात्र, मुंबईतील महानगरपालिका आणि पुण्यातील सरकारी रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर वगळता इतर डॉक्टरांना कोविड सेवेसाठी कुठलाही अतिरिक्त मोबदला मिळालेला नाही. या डॉक्टरांना वाढीव 30 हजार ते 50 हजार रुपये इतका पगार (विद्यावेतन) मिळावा, अशी मागणी या डॉक्टरांकडून होत आहे. मात्र, सरकार या मागणीकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे आता इंटर्न डॉक्टर आक्रमक झाले आहेत. सरकारी रुग्णालयातील हे इंटर्न डॉक्टर पुढील आठवड्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सध्या या डॉक्टरांनी कोविड सेवा बंद केली आहे. त्यांच्या या आंदोलनात मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर पाठिंबा म्हणून एक दिवस काम बंद करणार आहेत. याचा रूग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जुलै 2020पासून आहे वाढीव पगार देण्याची मागणी -
सरकारी रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांना 11 हजार रुपये पगार म्हणजेच विद्यावेतन मिळते. सरकारी रुग्णालयातील अंदाजे 2 हजार 950 डॉक्टर्स जून-जुलै 2020 पासून तर मुंबई पालिकेतील 550 इंटर्न डॉक्टर्स मार्च 2020पासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. अशावेळी मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयातील या डॉक्टरांना कोविडसाठी 39 हजार रुपये अतिरिक्त, असे एकूण 50 हजार रुपये विद्यावेतन मिळत आहे. तर, पुण्यातील सरकारी रुग्णालयातील इंटर्ननाही 30 हजार रुपये वेतन मिळत आहे. मात्र, इतर सरकारी रुग्णालयातील इंटर्न कोविड सेवा देत असतानाही त्यांना 11 हजार रुपयेच मिळत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये नाराजी आहे. आम्हालाही वाढीव पगार मिळावा, अशी मागणी या डॉक्टरांकडून केली जात आहे. जुलै 2020पासून ही मागणी होत आहे.
म्हणून काम बंद आंदोलनाचा इशारा -
या मागणीसाठी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (आस्मी) या इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानुसार या दोघांनी 22 डिसेंबरला वाढीव पगार मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता आस्मी आक्रमक झाली आहे. त्यानुसार त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 19 जानेवारीपासून सरकारी रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी कोविड सेवा बंद केली आहे. जर मागण्यांविषयी काही सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आता पुढील आठवड्यापासून नॉन कोविड कामही बंद करत हे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा आस्मीचे अध्यक्ष डॉ. वेदकुमार घंटाजी यांनी दिला आहे. हे सर्व डॉक्टर पुढील आठवड्यात बेमुदत संपावर जातील. याला मुंबईच्या पालिका रुग्णालयातील इंटर्नचाही पाठिंबा असेल. आम्ही मुंबईत एक दिवस काम बंद करू, असेही त्यांनी सांगितले आहे.