मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. शुक्रवारी लसीचा साठा कमी असल्याने 52 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आज (शनिवारी) ज्यांचा दुसरा डोस आहे, अशा लोकांनाच शिल्लक लसीच्या साठ्यामधून लस द्यावी, असे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
लसीचा तुटवडा -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार सूरु आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. कोरोनाचा प्रसार वाढताच नागरिकांमध्येही लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा साठा कमी असल्याने मुंबईतील 132 पैकी 52 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे.
लसीचा साठा शुक्रवारी रात्री येणे अपेक्षित आहे. तसा साठा आल्यास आज शनिवारी सर्व केंद्र लसीकरणासाठी खुली केली जातील. तोपर्यंत जो लसीचा साठा आहे तो जपून वापरावा व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांनाच लस देण्यात यावी, असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. लसीचा साठा आल्यावर लस पोहचवल्यावर लसीकरण सुरू होणार असल्याने आजचे लसीकरण उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत शुक्रवार एकूण 21 लाख 76 हजार 375 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 18 लाख 38 हजार 593 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 37 हजार 782 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 72 हजार 843 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 10 हजार 834 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 45 हजार 054 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 47 हजार 644 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,72,843
फ्रंटलाईन वर्कर - 3,10,843
जेष्ठ नागरिक - 8,45,054
45 ते 59 वय - 7,47,644
एकूण - 21,76,375