मुंबई - मानखुर्द येथील गोदामांना शुक्रवारी दुपारी आग लागली. ही आग विझवण्यासाठी २१ तास लागल्याने शनिवारी आग आटोक्यात आली. आगीत मोठ्या प्रमाणात गोदामे जळून खाक झाली आहेत. या आगीचा चौकशी अहवाल १५ दिवसांत प्राप्त होईल, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली.
ऑईलचे डबे फुटल्याने आग पसरली -
मानखुर्द पूर्वेला 'मंडाळा' भागात 'कुर्ला स्क्रॅप' परिसर आहे. याच परिसरातील सुमारे ४ एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात गोदामे, दुकाने इत्यादी व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे अनधिकृतपणे उभी राहिली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपासून काही अंतरावर असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनवण्याचे साहित्य, रद्दी, प्लास्टिक असे अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे सातत्याने आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मंडळा येथील अण्णाभाऊ साठेनगरमधील गोदामांना शुक्रवारी भीषण आग लागली. दुपारी २ वाजून ४७ मिनिटांनी आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट, आगीच्या ज्वालामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाला तारेवरची कसरत करावी लागेली. अथक प्रयत्नानंतर रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी आग आटोक्यात आणली गेली तर, शनिवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी पूर्णपणे विझवण्यात आली. आग विझवण्यासाठी तब्बल २१ तास लागले, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली. दरम्यान, आग विझवताना अग्निशामक दलाचे जवान हरीश नाडकर (वय ४०) हे जखमी झाले तर, उमेरा खान या महिलेला धुराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले.
१५ दिवसात मिळणार चौकशी अहवाल -
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. येत्या १५ दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती अग्निशामक दलाचे उप प्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली.
तर दुर्घटना टाळता येतील -
दोन गोदामांमध्ये पुरेसे अंतर असायला हवे. केमिकल, तेल किंवा ज्वलनशील पदार्थ गोदामात ठेवताना आवश्यक काळजी घेतली पाहिजे. गोदाम मालकांनी अग्नी प्रतिबंधक उपाययोजना केल्या तर दुर्घटना आणि जिवित व वित्तहानी टाळता येईल.