मुंबई - फेंटानिल जप्ती प्रकरणात गुजरात आणि मुंबईमधील काही कस्टम अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या २७ डिसेंबरला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने १०० किलो फेंटानील जप्त करत ४ जणांना अटक केली होती. त्याच प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे.
फेंटानिल जप्तीची कारवाई आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतर अमली पदार्थांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट समोर आल्यानंतर गुजरातमधून सॅम ओ केमिकल कंपनीचा मालक नटवरलाल मेहता याला अटक करण्यात आली होती. यानंतर यापुढे जाऊन गुजरातमधील या कंपनीमधून फेंटानिल हे अंमली पदार्थ बनावट कागदपत्रांच्या आधारे इटली व मेक्सिको देशात पाठवले जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून गुजरात व मुंबईमधील काही कस्टम अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा केली जाणार असल्याचे समोर आले आहे.
फेंटानिल अमली पदार्थ अत्यंत घातक आहे. फेंटानिल पेन किलर आणि भूल देण्याच्या औषधांमध्ये वापरले जात आहे. मात्र, या अंमली पदार्थाचे 0.01 ग्राम सेवन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. फेंटानिल अंमली पदार्थ कोकेण पेक्षा 50 टक्के अधिक नशा देते, तर मोर्फिन अंमली पदार्थापेक्षा १०० टक्के अधिक नशा देते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची मोठी मागणी आहे. भारतात फेंटानिल अंमली पदार्थ 12 कोटी प्रति किलो या भावाने विकले जाते.
दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईतील कांदिवली व नालासोपारा या परिसरातील राहणारे आहेत. सलीम ढाला (वय 52), चंद्रमणी तिवारी (वय 41), संदीप तिवारी (वय 38), धनंजय सरोज (वय 41) आणि नटवरलाल मेहता असे आरोपींचे नावे आहेत.