मुंबई - भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या 66 टक्के किंमतीवर कर आकारला जातो. पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर लादलेल्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये भारतापेक्षा अधिक कर वसूल केला जातो. तर स्पेन, जपान, कॅनडा आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये भारतापेक्षा कमी कर आकारला जात आहे, असे कन्सल्टन्सी फर्म ईवाय इंडियाच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे.
ईवाय इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आकडेवारीनुसार जून 2020 मध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 66.4 टक्के आणि 65.5 टक्के कर आकारण्यात आला. नऊ देशांपैकी ब्रिटन हा सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. जूनमध्ये पेट्रोलवर 71.1 टक्के आणि डिझेलवर 68.1 टक्के कर आकारला जात होता. अमेरिकेत पेट्रोलवर सर्वात कमी 23.1 टक्के आणि डिझेलवर 23.3 टक्के कर आकारला गेला.
1 जुलैला जाहीर झालेल्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार जून 2020 मध्ये भारतात महागाईचा दर 6.1 टक्के होता. किरकोळ चलनवाढ डिसेंबर 2019 मध्ये निर्धारित निर्देशांकापेक्षा 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही हा दर जास्त होता. कोरोनामुळे आर्थिक धोरणांवर प्रभाव पाडला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोलियम उत्पादने अद्याप जीएसटी कक्षेच्या बाहेर आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती कमी असूनही, केंद्र आणि राज्य सरकार कर वाढवित आहेत. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली, असेही ईवाय इंडियाचे आपल्या अहवालात म्हटले आहे.