मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरचे रुग्ण ( Measles Patients ) वाढले आहेत. यामुळे पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने कस्तुरबा रुग्णालयात आणखी १२ व्हेंटिलेटर आणि ४८ बेड्सचा एक वॉर्ड वाढवण्यात येणार आहे. यामुळे आणखी ४८ बेड्स वाढतील, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.
हे विभाग गोवरचे हॉटस्पॉट - मुंबईत सप्टेंबरपासून ताप पुरळ आलेले रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी काही रुग्णांना गोवरचा आजार झाल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. या ८ विभागातील झोपडपट्ट्यात गोवरचे आतापर्यंत १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. लक्षणे दिसणा-या ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णांला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
६१ रुग्ण रुग्णालयात - मुंबईतील गोवरचे एकूण ६८ मुले विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ६ मुले आयसीयुत आहेत. आयसीयूमध्ये असलेली ५ मुले ऑक्सिजनवर तर १ मुलगा व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईत ७ संशयीत मृत्यू - २६ ऑक्टोबर पासून आतापर्यंत मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. हे सर्व संशयीत रुग्ण आहेत. त्यामधील कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
लसीकरण आणि जनजागृतीवर भर - मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.
बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवणार - कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्या तीन वॉर्ड असून, ८३ खाटा, १० आयसीयू आणि पाच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून गोवरच्या संख्या वाढत असल्याने रुग्णांना उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये गरज भासल्यास ४८ खाटांचे आणखी एक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सध्या असलेले आयसीयूच्या १० खाटांमध्ये वाढ करून त्या २० पर्यंत वाढवण्याची तसेच सध्या असलेले ५ व्हेंटिलेटर १७ पर्यंत वाढवण्याची तयारी ठेवली आहे. त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.