मुंबई - कोरोनाची पहिली लाट ही जेष्ठांसाठी तर दुसरी लाट तरुणांसाठी घातक ठरली. अशात आता तिसरी लाट ही लहानग्यांसाठी घातक ठरणार असल्याचा इशारा जगभरातील शास्त्रज्ञांनी-तज्ज्ञांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर चिंता वाढली असताना दुसरीकडे याचे गंभीर्य ओळखत राज्य सरकारने लहान मुलांना या धोक्यापासून वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हेही वाचा - भारतीय युद्धनौकेने कतार बंदरहून आणले 40 टन लिक्विड ऑक्सिजन, फ्रान्सने केली मदत
राज्यात पीडियाट्रिक टास्क फोर्स (बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार तिसरी लाट आली तर त्यात नवजात बालकांना कोविडची लागण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात पीडियाट्रिक वॉर्डसह एनआयसीयूची गरज भासणार आहे. त्यामुळे, राज्यभरात एनआयसीयू बेड वाढवा, अशा सूचना आम्ही राज्य सरकारला केल्याची माहिती डॉ. समीर दलवाई, सदस्य, पीडियाट्रिक टास्क फोर्स यांनी खास 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. तर, बालरोग तज्ज्ञांची फौज तयार करण्यासह औषधे आणि इतर सुविधा वाढवण्याच्याही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पीडियाट्रिक टास्क फोर्स स्थापन
लहान मुलांचे अनेक प्रकारचे लसीकरण झाल्याने आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांना कोरोनाचा मोठा धोका नाही, असे सुरुवातीलाच सांगितले गेले. पहिल्या लाटेत हे खरेही ठरले. कारण पहिल्या लाटेत लहान मुलांना मोठ्या संख्येने लागण झाली नाही, तर दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित लहान मुलांची संख्या काहीशी वाढली. पण, आता मात्र तिसऱ्या लाटेत लहानग्यांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, लहानग्यांना कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी, तिसरी लाट थोपण्यासाठी आतापासूनच राज्य सरकार कामाला लागले आहे. त्यानुसार सर्वात आधी राज्य कोविड टास्क फोर्सच्या धर्तीवर पीडियाट्रिक (बालरोग तज्ज्ञ) टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. कालच या टास्क फोर्सची स्थापना झाली आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय ओक, राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, बालरोग तज्ज्ञ डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर आणि डॉ. सुहास प्रभू यांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश आहे. हे टास्क फोर्स कालच स्थापन झाले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी या टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. तर, अनेक महत्वाच्या आणि तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचना लेखी देण्यात आल्याचे डॉ. दलवाई यांनी सांगितले.
नवजात बालकांना लागण?
पहिल्या, दुसऱ्या लाटेत मुले बऱ्यापैकी बचावले आहेत, पण तिसरी लाट आता लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार आहे. ब्राझीलमध्ये हे खरे ठरताना दिसले. ब्राझीलमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले बाधित झाली, तर बऱ्यापैकी लहानग्यांचा मृत्यूही झाला. अशात भारतात आता तिसरी लाट सप्टेंबरच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. सद्या देशात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. तिसरी लाट येईपर्यंत मोठ्या संख्येने लसीकरण होईल. तेव्हा हा गट बऱ्यापैकी सुरक्षित होईल. अशावेळी लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे, आता पीडियाट्रिक टास्क फोर्सच्या माध्यमातून तिसरी लाट थोपवण्यासाठी आणि तिसरी लाट आल्यास लहानग्यांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली असल्याचे डॉ. दलवाई यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, 10 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. पण, त्याचवेळी नवजात शिशू आणि पाच वर्षांपर्यंतचे मुलेही बाधित होऊ शकतात. तेव्हा त्यांना योग्य औषधोपचार आणि सुविधा मिळणे गरजेचे आहे. तर, या गटाला एनआयसीयूची गरज मोठ्या संख्येने लागू शकते. त्यामुळे, मुंबईसह राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात एनआयसीयू बेड वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या दृष्टीने लवकरच आराखडा तयार करत बेड वाढवले जाणार आहेत.
बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षण
लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास आणि त्यांना माईल्ड लक्षणे असल्यास घरी पालकांनी त्यांची कशी काळजी घ्यावी यासाठीच्या गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहेत. तर, मुलांचे आणि पालकांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालक-मुलांचे समुपदेशन केले जाणार असल्याचे डॉ. दलवाई यांनी स्पष्ट केले. तर, राज्यात सर्व बालरोग तज्ज्ञांसाठीही औषधोपचारासाठी गाईडलाईन तयार करण्यात येणार आहेत. अथवा इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या गाईडलाईन्स पाळण्याच्याही सूचना केल्या जाणार आहेत. यासाठी सर्व बालरोग तज्ज्ञांना कोविडसाठी ट्रेनिंग दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचीही माहिती डॉ. दलवाई यांनी दिली.
12 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाचीही शिफारस
जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. भारतात 16 जानेवारीपासून या मोहिमेला सुरवात झाली आहे. 18 वर्षांपुढील सर्वाचे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, लहान मुलांना अर्थात 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना जगात अजून कुठेही लस देण्यात आलेली नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. पण, लहान मुलांना लस देण्यात येत नाही व कुठल्याही देशात लस देण्यात आलेली नाही. असे असले तरी 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देता येईल का? यावर परदेशात संशोधन सुरू आहे. इतकेच नव्हे तर, 6 महिन्यांच्या बाळांपासून लस देता येईल का? या दृष्टीने ट्रायल सुरू असल्याचे डॉ. दलवाई यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भारतातही 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देता येईल का? या दृष्टीने अभ्यास करावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.
राज्यातही या दृष्टीने विचार व्हावा, अभ्यास व्हावा अशी आमची मागणी आहे. तशी शिफारसही केल्याचे डॉ. दलवाईनी सांगितले. पण, लहान मुलांचे लसीकरण हे सद्या तरी खूप दूरची बाब आहे. 18 वर्षांपुढील लोकांनाच लस मिळत नाही, लसीचा मोठा तुटवडा आहे. तेव्हा मुलांचे लसीकरण होण्यास किती वेळ लागेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे, आता लहान मुलांना कोरोनापासून वाचवणे, त्यांना योग्य उपचार मिळावेत हे गरजेचे आहे. त्यात जर पालकांनी आणि घरातल्या सर्वांनी लस घ्यावी आणि आपाल्या मुलांना सुरक्षित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा - ५० लाख लस खरेदी करणार, मोफत लसीसाठी गळा काढणाऱ्यांनी सेंटरवर जावं- मुंबई महापौर