मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये सायबर गुन्हेगारी वाढल्याचं समोर येत आहे. खास करून मॅट्रिमोनिअल साईट्स वर महिलांसोबत फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अधिक वाढ झाल्याचं समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यात मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारी च्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. याचा आढावा घेणारा टीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत.
मॅट्रिमोनी साईटवर महिलांसोबत आर्थिक फसवणूक
जानेवारी ते जून २०२१ या दरम्यान मुंबई शहरात सायबर गुन्हेगारीचे तब्बल 901 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या 94 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या 901 गुणांपैकी केवळ 92 गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत दरम्यान सायबर गुन्ह्यांमध्ये मॅट्रिमोनियल साईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, बदनामी करण्याच्या धमकी वर ब्लॅकमेल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या संदर्भात अधिक गुन्हे घडत आहे.
विविध सायबर गुन्हे
जानेवारी ते जून २०२१ या दरम्यान मुंबई शहरात सायबर पोलीस विभागाकडून संगणकाच्या सोर्सकोड बाबत छेडछाड करण्याच्या संदर्भात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगणक प्रणालीवर सायबर हल्ल्यात करण्याच्या संदर्भात 1 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इंटरनेटवर फिशिंग -हॅकिंग संदर्भात 4 गुन्हे तसेच महिलांना अश्लील ई-मेल्स, एसएमएस, एमएमएस पाठवण्याच्या संदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 92 गुन्हे दाखल केले आहेत. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवून बदनामी करण्याच्या संदर्भात 19 गुन्हे दाखल झालेत तर क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या संदर्भात 203 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . इतर प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी 580 गुन्हे नोंदवले आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यात वाढ
जानेवारी 2020 ते जून 2022 या दरम्यान मुंबई शहरात अश्लील ई-मेल एसएमएस पाठवण्याच्या संदर्भात 72 गुन्हे घडले होते. मात्र 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात हेच प्रमाण वाढून 92 गुन्ह्यांवर गेलेले आहे. महिलांच्या बाबतीत बनावट प्रोफाइल सोशल माध्यमांवर बनवण्याच्या संदर्भात जानेवारी 2020 ते जून 2020 या दरम्यान 16 गुन्हे दाखल करण्यात आले होते .मात्र, हेच प्रमाण 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात वाढले असून 19 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - सोशल मीडिया फेम हिमांशी गांधीची आत्महत्या, दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारतानाचा VIDEO व्हायरल