मुंबई : राज्यात नव्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या विषाणूच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. राज्यात आज एच 3 एन 2 चे 18 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एच 1 एन 1 च्या रुग्णांचा आकडा 405 तर एच 3 एन 2 च्या रुग्णांचा आकडा 184 वर पोहचला आहे. राज्यात इन्फल्युएंझाचे एकूण 589 रुग्ण नोंद झाले आहेत. तर आज 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही मृत्यू संशयित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राज्यात गेले काही महिने आटोक्यात असलेला कोरोना मार्च महिन्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. तसेच 16 मार्चला राज्यात 226 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन 249 रुग्णांची नोंद झाली आहे.
इन्फल्युएंझाचे 184 रुग्ण : 1 जानेवारी ते 17 मार्च 2023 या कालावधीत इन्फल्युएंझाची लक्षणे असलेले 3,04,686 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1643 रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले आहे. त्यात एच 1 एन 1 चे 405 तर एच 3 एन 2 चे 184 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 196 रुग्ण सद्या रुग्णालयात भरती आहेत. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एच 1 एन 1 मुळे 3 मृत्यू झाले आहेत. एच 3 एन 2 मुळे अहमदनगर येथे 1 मृत्यू झाला होता. आणखी 3 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. वाशीम, खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे येथे हे मृत्यू नोंदवले गेले आहेत. डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर हे मृत्यू एच 3 एन 2 मुळे झाले आहेत का हे समोर येणार आहे.
कोरोनाचे 249 नवे रुग्ण : राज्यात आज 18 मार्च रोजी 249 रुग्णांची नोंद झाली आहे. 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 1164 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 39 हजार 501 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 79 लाख 89 हजार 909 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 428 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 3 मार्चला 66, 7 मार्चला 80, 9 मार्चला 90, 10 मार्चला 93, 11 मार्चला 114, 12 मार्चला 101, 14 मार्चला 155, 15 मार्चला 176, 16 मार्चला 226, 17 मार्चला 197 रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत 71 रुग्णांची नोंद : मुंबईत आज 18 मार्च रोजी 71 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 246 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 774 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2 मार्चला 18, 9 मार्चला 18, 10 मार्चला 21, 11 मार्चला 25, 12 मार्चला 19, 14 मार्चला 36, 15 मार्चला 36, 16 मार्चला 31, 17 मार्चला 36 रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत 11 रुग्ण रुग्णालयात : मुंबईत आज 6 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिका, राज्य सरकारच्या रुग्णालयात 4351 खाटा उपलब्ध असून आतापर्यंत एकूण 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूसह इन्फ्लुएन्झाचे रुग्ण वाढू लागल्याने 150 रुग्णालयातील 1500 बेडस तैनात ठेवा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
काय आहे इन्फल्युएंझा : इन्फल्युएंझा हा आजार विषाणूंमुळे होतो. इन्फल्युएंझा टाईप ए चे एच 1 एन १, एच २ एन २, एच ३ एन २ हे उपप्रकार आहेत. इन्फल्युएंझा आजारात ताप, खोकला, घशात खवखव होणे, चालताना धाप लागणे, न्यूमोनिया इत्यादी लक्षणे आढळतात. कोविड १९ आणि इन्फल्यूएंझा रुग्णांच्या सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फल्यू असलेल्या रुग्णांवर विनाविलंब उपचार करा, राज्यातील शासकिय रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करा, आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अशी घ्यावी काळजी :
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या.
- रुग्णाच्या सहवासात आलेल्या लोकांना दहा दिवसात फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा.
- सर्दी खोकला सारखे आजार असल्यास ते अंगावर काढु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू वर औषध सुरु करावे.
- गरम पाण्याची वाफ घ्यावी.
- खोकला असल्यास तोंडावर मास्क लावावे किंवा तीन पदर करुन हातरुमाल वापरावा.
- आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
हेही वाचा : Mega Blocks : मध्य रेल्वेवर आज रात्रीपासून दोन मेगा ब्लॉक