मुंबई: दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी ही मागणी 23 ते 24 हजार मेगावाट दरम्यान पोहोचत असते. मुंबई वगळता राज्यातील विविध भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने विजेची मागणीही वाढली आहे. ही मागणी सद्यस्थितीत 24 हजार 500 मेगावाट पर्यंत पोहोचल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
विजेच्या मागणीचा चढता आलेख: राज्यात 12 एप्रिल रोजी वीज ग्राहकांकडून 23 हजार 285 मेगावॅटची मागणी नोंदवली गेली. 13 एप्रिल रोजी 23 हजार 811 , 14 एप्रिल रोजी 23 हजार 589 मेगावॅट, 15 एप्रिल रोजी 22762 मेगावॅट तर 16 एप्रिल रोजी 22 हजार 445 मेगावॅट इतकी नोंद झाली. 17 एप्रिलला पुन्हा या मागणीमध्ये वाढ होऊन 23 हजार 755 मेगावॅट तर 18 एप्रिल रोजी 24 हजार 326 मेगावॅटपर्यंत विजेची मागणी पोहोचली. 19 एप्रिल रोजी पुन्हा या मागणीत वाढ होऊन ती 24500 मेगावॅटच्या आसपास पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले.
वनव्यामुळे 347 मेगावॅट विजेचा तुटवडा: बुधवारी रायगड आणि ठाणे परिसराला सुमारे 3 तास भारनियमनाचा सामना करावा लागला. यासंदर्भात बोलताना महापारेषणचे अभियंता शशांक जेवळीकर यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील केवले गावाजवळ डोंगराळ भागात जंगलातील आगीमुळे खारघर तळेगाव लाईन मध्ये दुपारी दोन वाजता तांत्रिक बिघड झाला. महापारेषणने याची दखल घेत ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित केला; परंतु महापारेषच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर लगेच वीज पुरवठा सुरळीत केला गेला. यामध्ये सुमारे 347 मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागले; मात्र त्यानंतर आता वीज पुरवठा सुरळीत असल्याची माहिती महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे तळेगाव, खारघर, पडघा, कळवा या फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाला होता. भांडुप, महापे, कळवा, मुलुंड, नेरूळ, खारघर या उपकेंद्रांवरील विजेचे भार नियमन करावे लागले होते, अशी माहिती त्यांनी दिली; मात्र ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात कुठेही भार नियमन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: 2002 Gujarat Riots: नरोडा दंगल प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, विशेष न्यायालयाचा निर्णय