मुंबई- बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह मधु वर्मा मंटेना, विक्रमादित्या मंटेना आणि विकास बहल यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या कारवाईनंतरही आयकर विभागाकडून अद्याप तपास सुरूच आहे. मुंबई, हैदराबाद, दिल्ली पुणे या शहरातील तब्बल 28 ठिकाणी मारण्यात आलेल्या छापेमारीनंतरची कारवाई अजूनही सुरू आहे. यामध्ये जवळपास 650 कोटी रुपयांच्या रकमेची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे.
तापसी पन्नूला १२ प्रोजक्टमधून मिळाली मोठी रक्कम-
सिनेकलाकारांच्या मालमत्तांवर 3 मार्चला सुरू करण्यात आलेली ही छापेमारी तिसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) सुद्धा सुरूच असल्याचे आयकर सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तापसी पन्नू हिच्या घरातून 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तापसी पन्नू सध्या 12 प्रोजेक्ट मध्ये काम करत असून यासंदर्भात तिला मोठी रक्कम मिळालेली आहे. मात्र या संदर्भातील कर भरणा हा नियमितपणे भरण्यात आला नसल्याचंही त्यांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 300 कोटी रुपयांचा कर भरण्यासंदर्भात आयकर विभागाला समाधानकारक उत्तर कुणीही देऊ शकलेले नाही. या याबरोबरच तापसी पन्नू अनुराग कश्यप यांच्या मोबाईल फोनमध्ये काही व्हाट्सअप चॅट डिलीट करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
कागदपत्र व डिजीटल डेटा हस्तगत-
दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांची चौकशी पुण्यातील एका हॉटेलमध्ये करण्यात येत आहे. मुंबईतील फँटम फिल्म व क्वाण टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयावर मारण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्र व डिजीटल डेटा आयकर विभागाला हस्तगत झाला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत फँटम फिल्मकडून निर्मित करण्यात आलेल्या चित्रपटांचे बॉक्स कलेक्शन हे अधिक दाखवण्यात आलेले असून त्याच्या संदर्भात करण्यात आलेला कर चुकवण्यात आल्याचे म्हटले आहे.