मुंबई : आयकर विभागाने शुक्रवारी पहाटे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी कल्पतरू ग्रुपच्या मुंबईतील मुख्यालयात छापे टाकले. तसेच आयकर विभागाने आज राजस्थान आणि मुंबईतील कल्पतरू समूहाच्या संबंधित ठिकाणांचीही झडती घेतली. करातील अनियमिततेबाबत ही छापेमारी करण्यात आली आहे.
शेकडो कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार उघडकीस : आयकर विभागाने कल्पतरू समूहाचे संस्थापक मोफतराज पी मुनोत आणि व्यवस्थापकीय संचालक पराग एम मुनोत यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शेकडो कोटींच्या निधीचा गैरवापर उघडकीस आला आहे. प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी महाराष्ट्र आणि गुजरातसह कल्पतरू ग्रुपच्या चार राज्यांतील ३० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले. संस्थापक मोफतराज मुनोत आणि एमडी पराग मुनोत यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आता कल्पतरू ग्रुपच्या चारही कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत.
कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण : या छापेमारीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कल्पतरू ग्रुपचा एक भाग असलेल्या कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले. दुपारी 12:10 वाजता बीएसईवर कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरून 616.65 रुपयांवर व्यवहार करत होते.
कल्पतरू बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी : या वर्षी मे महिन्यात कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनने त्यांचे नाव बदलून कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल अशी केले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासह भागधारक आणि नियामक प्राधिकरणांकडून मंजूरी मिळाल्यानंतर हे नाव बदलण्यात आले. कल्पतरू ही वीज वितरण, इमारती आणि कारखाने, पाणीपुरवठा आणि सिंचन, रेल्वे, तेल आणि वायू पाइपलाइन, शहरी गतिशीलता (फ्लायओव्हर्स आणि मेट्रो रेल्वे), महामार्ग, विमानतळ यामध्ये गुंतलेल्या मोठ्या बांधकाम कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. 30 मे रोजी, तीन प्रवर्तकांनी कंपनीचे 467.83 कोटी रुपयांचे शेअर्स पॉवर ट्रान्समिशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ईपीसीमध्ये खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे ऑफलोड केले होते.
हेही वाचा :
- Kerala Youtubers : भन्नाड यूट्यूबर्सवर धडक कारवाई, करबुडव्यांकडून 25 कोटींची रक्कम वसूल करणार
- Income Tax Return Last : प्राप्तीकर भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; रिटर्न भरला नाहीतर होईल 'हे' नुकसान
- Bogus Income Tax Refund Claim Case : 263 कोटींच्या बोगस आयकर रिफंड क्लेम प्रकरणात अभिनेत्री कीर्ती वर्माचाही सहभाग