मुंबई - प्रभादेवीतील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलने सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 2020-21 या शैक्षणिक वर्षाचे 27 हजार 800 रुपये शुल्क एकरकमी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोनाकाळामध्ये अनेक पालकांचा रोजगार गेला, अनेकांना निम्मे वेतन मिळत आहे, अशा परिस्थितीमध्ये एकर कमी शुल्क भरणे शक्य नसल्याने पालक आर्थिक विवंचनेत पडले होते. यासंदर्भात विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर शाळांने पालकांना 15 नोव्हेंबरपर्यंत शुल्क भरण्याची सवलत दिली आहे.
पालकांची आर्थिक परिस्थिती
गर्ल्स कॉन्व्हेन्ट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना एकरकमी शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील, अशा सूचना शाळा प्रशासनाने दिल्या होत्या. मागीलवर्षी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेक पालकांना शुल्क भरणे शक्य झाले नाही. त्यातच आता पुन्हा केलेल्या लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली, पालक हतबल झाले होते. नोकरी, व्यवसाय ठप्प झाला असताना 27 हजार 800 रुपये इतकी रक्कम एकत्र कशी भरायची, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला होता.
आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार
हतबल झालेल्या पालकांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्य मंत्री बच्चु कडू यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच त्यांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयातही तक्रार केली होती. त्यानंतर शाळेने माघार घेत पालकांना दोन हप्त्यांमध्ये शैक्षणिक शुल्क भरण्याचे लेखी आदेश काढून पालकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; आता 'या' महिन्यांमध्ये होणार परीक्षा