मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी गेले तीन महिने लसीकरण मोहीम सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असताना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच केंद्र सरकारने १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे घोषित केले आहे. यासाठी पालिकेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यात लसीकरण केंद्र वाढवणे, एखाद्या कंपनीत जास्त कर्मचारी असल्यास त्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे, लस पालिकेने स्वतः खरेदी करणे आदी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लसीचा तुटवडा, केंद्र बंद -
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला सुरुवात झाल्यावर नागरिकांनी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यावर नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईत दिवसाला ३० ते ५० हजारापर्यंत लसीकरण होत आहे. आतापर्यंत मुंबईत २१ लाख २८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोठ्या संख्येने होत असल्याने मुंबईत कित्येकवेळा लसीचा तुटवडा जाणवला आहे. मुंबईत आजही लसीचा तुटवडा असल्याने १३२ पैकी ६१ केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे इतर केंद्रावर गर्दी होत आहे. इतर लसीकरण केंद्रांवर जोपर्यंत लसीचा साठा आहे तोपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू राहतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लवकरच लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असून बंद झालेली लसीकरण केंद्रे पूर्ववत होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिकेकेकडून नियोजन सुरू -
मुंबईत लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नाही, असे बोर्ड पाहून नागरिकांना घरी परतावे लागत आहे. सद्यस्थितीत मुंबईत पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने खासगी केंद्रांना डोस उपलब्ध करुन देणे पालिकेला कठीण जात आहे. दरम्यान केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. मुंबईत १८ वर्षावरील ८० लाख नागरिक आहेत. या लाखो नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत आहे. सध्या मुंबईत पालिकेची ४० व खासगी ७०, तसेच राज्य व केंद्र सरकारची रुग्णालये अशी एकूण १३२ केंद्रे आहेत. पालिकेची ४० वरून १००पर्यंत केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. खासगी आस्थापना ज्यात जास्त संख्येने कामगार आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम विभागात लसीकरण केंद्रे उभारली जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
लसीसाठी प्रयत्न -
मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र ५० टक्के तर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन लसीचा ५० टक्के साठा विकत घेऊ शकतात. यानुसार मुंबई महापालिका लस खरेदी करण्याचा विचार करत आहे. लस खरेदी केल्याने पालिकेकडे लसीचा साठा कमी पडणार नाही अशा प्रकारे नियोजन केले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.