मुंबई - कोरोना विषाणूचे रुग्ण हे मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देशभरात लॉकडाऊन काळ 17 मे पर्यंत वाढवला असून, कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, 20 मार्च ते 1 मे या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 5 हजार 665 प्रकरणात तब्बल 10 हजार 683 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 1 हजार 254 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून, तब्बल 2 हजार 762 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 6667 आरोपींना जामिनावर सोडून दिले आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 64 जणांवर कारवाई केलेली आहे.
विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 3 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, मध्य मुंबई 29 पूर्व मुंबईत 4 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबई 25 आणि उत्तर मुंबई 3, अशी कारवाई केली आहे.