मुंबई - विजया दशमी दसऱ्यानिमित्त राज्यात आज (रविवारी) विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच आज होणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडी, कार्यक्रम 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येणार आहेत.
- शिवसेना दसरा मेळावा -
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे विशेष आकर्षण असणार आहे. दसरा मेळाव्यातून यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून काय बोलतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कोरोनाचे संकट असले तरी यंदाही शिवसेनेचा दसरा रविवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होईल. कार्यक्रम 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) दसरा मेळावा -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदाही साजरा होणार आहे. मात्र, यावर्षी कोणतेही शारीरिक प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम होणार नाहीत. या कार्यक्रमाला मोजक्याच संख्येत स्वयंसेवक उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांना मार्गदर्शन करतील. सकाळी ८ वाजल्यापासून कार्यक्रम 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.
- भगवान गड दसरा मेळावा -
मागील अनेक वर्षांपासून होणारा दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव येथून ऑनलाइन होणार असल्याची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको, म्हणून दसरा मेळावा ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. साडेबारा वाजल्यापासून कार्यक्रम 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.
- दीक्षाभूमी दसरा मेळावा -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. यामुळे विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. येथील कार्यक्रम दुपारनंतर 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.
- नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा दसरा उत्सव -
३०० वर्षाची परंपरा असलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सशर्त परवानगी दिली आहे. येथील कार्यक्रम दुपारनंतर 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.
- म्हैसूर प्रसिद्ध दसरा मेळावा -
म्हैसूरच्या प्रसिद्ध दसरा उत्सवाची शनिवारी सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही १० दिवस हा कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे. रविवारी दुपारी १.५७ वाजल्यापासून हा कार्यक्रम 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांना लाईव्ह पाहता येईल.