मुंबई - एनआयएने सचिन वाझेच्या बाबतचे सर्व जबाब सर्वसामन्याच्या समोर आणावे. त्याबरोबर राजकीय व प्रशासकीय गुन्हेगारीला लगाम घालायची असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करावी. या याबाबतचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन हत्याप्रकरण, सचिन वाझेंना झालेली अटक त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, या सर्व घटनांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
हायप्रोफाईल आत्महत्याचे गूढ
राजकारणातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत आहेत, असे दिसत आहे. चार हाय प्रोफाइल आत्महत्या झाल्या, असे सांगण्यात आले. पण, वैद्यकीय अहवाल सांगताय की या आत्महत्या नाहीत. दिशा सालीयन, मोहन डेलकर, सुशांतसिंह राजपूत, पूजा चव्हाण या सगळ्यांनी आत्महत्या केल्याचे दाखवण्यात आले. पण, या आत्महत्या आहे की खून याबाबत अजून लोकांच्या मनात शंका आहे.
संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकाकडून होत आहे. या मागणीचा खासदार संजय राऊत यांनी सकाळी समाचार घेतला होता. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये. मी शिकवण्याच्या परिस्थितीत राहिलो नाही. मीच लेक्चर घेत असतो त्यामुळे ज्यांना कोणाला शिकायचे असेल त्यांनी मझ्याकडे यावे.
पोलिसांमार्फत पक्षासाठी निधी गोळा करावा हा निर्णय झाला होता का
माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपानंतरही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. यावरुन असे वाटते की, राजकीय पक्षाने पोलिसांमार्फत पक्ष निधी गोळा करम्याचा निर्णय झाला आहे का, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा - धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र, रोज एक हजार जणांना दिली जाणार लस
हेही वाचा - होम क्वारंटाईन असताना अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली कशी? फडणवीसांचे शरद पवारांना ट्विट