मुंबई - मुंबईतील शल्यचिकित्सक आणि प्रसिद्ध डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा रहेजा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे, तर खासगी डॉक्टरांनाही 50 लाखांचा आरोग्य विमा लागू करावा ही मागणी जोर धरत आहे.
डॉ. भावे यांना बेड न मिळाल्याने उपचारास विलंब झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्यांची वयाची साठी उलटली होती. त्यांना मधुमेह होता, त्यांना स्टेंट बसवण्यात आला होता. हे सर्व असतानाही केवळ कर्तव्य म्हणून ते रुग्णसेवा देत होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी बेडसाठी रहेजा रुग्णालयामध्ये विचारणा केली. बेड उपलब्ध झाल्याबरोबर त्यांना दाखल करून घेत उपचार सुरू झाले. मात्र, वय आणि विविध आजारामुळे त्यांना कोरोनावर मात करता आली नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे.
राज्यात आजही आयएमएचे डॉक्टर सेवा देत आहेत. पण त्यांना पीपीई किट उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना संसर्ग होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला पीपीई किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे, तर आतापर्यंत डॉ. भावे यांच्यासह राज्यात 5 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण या कोरोना योद्ध्यांना 50 लाखांच्या विम्याचा लाभ फक्त ते खासगी डॉक्टर असल्याने मिळणार नाही. त्यामुळे जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही 50 लाखांचा विमा लागू करावा, अशी मागणी डॉ. भोंडवे यांनी केली आहे. त्याचवेळी या 5 डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून 15 ऑगस्टला गौरव करावा, असेही ते म्हणाले.