नागपूर- कोरोनामुळे सध्या नागपूर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम देखील बदलण्यात आले आहेत. असे असताना देखील नागपूरात नियमांचे सर्रासपणे उल्लंनघन केले जात असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदी दरम्यान दिसून आले आहे. वाहतुकीचे नियमानुसार बसच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या बसमध्ये नियमापेक्षा जास्त प्रवासी बसवून नेले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. अशा बसवर झोन 2 च्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू दंडात्मक कारवाई केली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
धंतोलीमधील यशवंत स्टेडियममागील भागात झालेल्या या कारवाईत महादेव ट्रॅव्हल्स, आमर्दिप ट्रॅव्हल्सच्या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळून आले आहेत. 30 प्रवासी क्षमता असलेल्या बसमध्ये 56 प्रवसी भरल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्स एजन्सीवर कार्यवाही केली आहे.
कामगार गावी परतायला सुरवात
सध्या नागपूर शहरात संचारबंदी सुरू असल्यामुळे सर्वत्र कामधंदे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इतर क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे प्रचंड नुकसान होत आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मजूर वर्ग कामाकरिता नागपूरला येतात. मात्र संचारबंदीमुळे काम उपलब्ध नाहीत. त्यामुळे मजूर वर्गाने आपापल्या गावाची वाट धरली आहे. या संधीचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून घेतला जात आहे. ५० आसन क्षमता असलेल्या बसमध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांना कोंबून नेले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
हेही वाचा- अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त