मुंबई- शहर तसेच राज्यामध्ये अनधिकृत स्कूल व्हॅनचा धंदा सध्या जोरात सुरु आहे. अंदाजे चाळीस हजारांहून अधिक अनधिकृत स्कूल व्हॅन मुंबई तसेच राज्यभरातील वेगवेगळ्या नगरांमध्ये कार्यरत आहेत. राज्य सरकारने तयार केलेल्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमावलीचा कोणताही नियम या अनधिकृत स्कूल व्हॅन चालकांकडून पाळला जात नसल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यात परिवहन विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप स्कूल व्हॅन असोसिएशन यांनी केला आहे. त्यामुळे अनधिकृत स्कूल व्हॅन फोफावल्या आहेत. तसेच एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी विचारला आहे.
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही बेकायदेशीर, स्कूल व्हॅनमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक राज्यासह मुंबईत सर्रासपणे सुरू असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे परिवहन विभागाने नेमलेल्या 50 अधिकाऱ्यांनी पाच दिवसांत केवळ 30 गाड्यांवर कारवाई केली आहे. यावरूनच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर नसल्याची प्रतिक्रिया स्कूल बस ओनर्स संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.
अनिल गर्ग यांनी 'ईटीव्ही'ला दिलेल्या माहितीत सांगितले की, बेकायदेशीर स्कूल व्हॅनसंदर्भात उच्च न्यायालयानेही परिवहन आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. पण ते त्याबाबत आयुक्त आग्रही दिसत नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने परिवहन आयुक्तांना पुन्हा एकदा कारवाई करण्यासाठी विनंती पत्र दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनाही देणार आहोत.