मुंबई : एका व्यक्तीने व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले होते आणि त्यामध्ये 'त्या' घटनेबाबत गुगलवर जाऊन टाईप करा आणि सर्च करा असे म्हटले होते. त्या संदर्भात तक्रारदाराने तसे केल्यानंतर धार्मिक द्वेषासंदर्भातील तेथे माहिती त्याला आढळून आली. त्यामुळे त्याने याबाबत तक्रार दाखल केली आणि अखेर तो खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वर्ग झाला. त्या संदर्भात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी खंडपीठाने त्यावर दाखल झालेली 'एफआयआर' रद्द न करता नमूद केले की, "व्हाट्सअप स्टेटस ठेवत असताना कोणत्याही समूहाच्या किंवा धर्माच्या व्यक्तींच्याबाबत द्वेष पसरवला जाणार नाही याचे भान सर्वांनीच बाळगले पाहिजे."
काय आहे प्रकरण - नागपूर येथील किशोर लांडकर या युवकाने व्हाट्सअपवर एक स्टेट्स ठेवलेले होते. हे स्टेटस एकाने वाचले आणि त्यानंतर त्याने त्या संदर्भातील पुढची माहिती वाचल्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. किशोर लांडकर याने व्हाट्सअप स्टेटसला केलेल्या पोस्टमध्ये येथे क्लिक करा आणि गुगलला जाऊन सर्च करा, असा उल्लेख लिंक देऊन केला होता. तक्रारदाराने तशी प्रक्रिया केली आणि गुगलवर जाऊन सर्च केले, तर एका धर्माविषयी द्वेषपूर्ण काही माहिती त्या ठिकाणी तक्रारदाराला आढळून आली. त्यामुळे त्याने यासंदर्भात तक्रार दिली. त्यामुळे आरोपीने आपल्यावरील दाखल तक्रार रद्द होण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र आरोपीवरील एफआयआर न्यायालयाने रद्द केली नाही.
तक्रारदाराचे मत : यासंदर्भात आरोपी किशोर लांडकर याचा दावा होता की, त्याने व्हाट्सअपला जे स्टेटस ठेवले आहे, त्या स्टेटसमध्ये त्यांनी कुठेही दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींविषयी किंवा समूहाविषयी द्वेषपूर्ण भावना भडकवणारे विधान केलेले नाही. तसेच तशी कोणतीही माहिती तिथे दिलेली नाही; परंतु या त्याच्या दाव्याला खंडन करत असताना तक्रारदाराच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली की, त्याने व्हाट्सअप स्टेटसवर ज्या प्रकारे एक लिंक दिली आणि ती लिंक गुगलवर सर्च करा असे म्हटले. गुगलवर ते सर्च केले तेव्हा त्या सर्चनंतर जी माहिती आढळली त्यामध्ये धार्मिक द्वेष भडकवणारे ते साहित्य त्यात होते.
न्यायालयाची आरोपीला तंबी : दोन्ही पक्षकारांची बाजू न्यायालयाच्या पटलावर मांडली गेली. त्यावेळेला न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती एसए मेनिझेस यांनी यासंदर्भात त्या आरोपीचा एफआयआर रद्द न करता महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. खंडपीठाने असे म्हटले की, व्हाट्सअपवर कोणीही स्टेटस ठेवतात; परंतु स्टेट्स ठेवताना किंवा कोणतीही पोस्ट लिहिताना याचे भान बाळगले पाहिजे की, कोणत्याही दुसऱ्या समूहाच्या किंवा धर्माच्या व्यक्तींच्या विरोधात द्वेष पसरला जाणार नाही. हे भान सर्वांनीच बाळगले पाहिजे, अशी तंबी न्यायमूर्तींनी दिली.