मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारमध्ये दम नसल्याची टीका केली आहे. यावर उत्तर देताना केंद्राकडून केळी विम्याचे नियम बदलून आणले तरी फडणवीसांमधील दम सिद्ध होईल, असा टोला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. तर, केळी आणि फळांच्या नुकसान भरपाईबाबत नियमात बदल करता यावेत म्हणून एका समितीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
केंद्र सरकारने शेतीबाबत नियमात बदल केले आहेत. तसेच, फळांचा विमा आणि नुकसान भरपाईच्या नियमातही बदल केले आहेत. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पाटील यांनी केंद्राकडून केळी विम्याचे नियम बदलून आणले तरी फडणवीसांमधील दम सिद्ध होईल, असा टोला लगावला.
खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, त्यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. जळगावचे राजकारण जळणारेही आहे आणि त्यावर पाणी ओतणारेही आहे, असेही पाटील म्हणाले. आज कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने केळी उत्पादक शेतकऱ्यासंदर्भात बैठक झाली. या संदर्भात दोन वेळा कॅबिनेटमध्ये विषय मांडला होता. आज दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. विमा कंपनी आणि अभ्यास गटाची नियुक्ती झाली आहे. त्यातून काय मार्ग निघेल यावर दोन दिवसांनी निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विम्याचे पैसे भरण्यासाठी ३० ऑक्टोबर ही तारीख शेवटची असल्याने त्या अगोदरच निर्णय घेतला जाईल, असेही पाटील म्हणाले.
त्याचबरोबर, केळी आणि इतर फळांच्या विम्याबाबत जे काही ट्रिगर बदलले आहेत, त्यात काय सुधारणा करता येतील, फळ झाडांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई कशी देता येईल, विम्याबाबत कोणते धोरण करता येईल याबाबत एका समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
हेही वाचा- मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 7 हजार 392 जणांवर पोलिसांची कारवाई