मुंबई : बुधवारी रंगणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी मुंबईचे संपूर्ण वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) फुल्ल झाले आहे. तिकिटांच्या प्रतीक्षेत आजही लाखो चाहते सर्व ठिकाणी विचारणा करत आहेत. हजारोंचे तिकीट लाखोच्या किंमतीत विकली जात आहेत. अशात मुंबईत वानखडेवर मॅच होत असल्यानं सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी या मॅचपासून वंचित राहत असल्यानं, मुंबई क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
काळाबाजारावर कुणाचाही वचक नाही : २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियम वर होत आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असताना, या सामन्यासाठी असलेल्या तिकिटांचा काळाबाजार सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं उघड झालं आहे.
अडीच हजार आणि चार हजार रुपये मूळ तिकिटांची किंमत असलेली तिकिटं २५ हजार ते ५० हजार रुपयाला विकली जात असल्या प्रकरणी, मुंबई पोलिसांनी त्यांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकूण ३३ हजार १८० आसनांची क्षमता आहे. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच पाहण्यासाठी कित्येक लाख क्रिकेट चाहते आतुर आहेत. अशात ज्यांनी यापूर्वी तिकीट आरक्षित करून ठेवली आहेत त्यांना या रंगतदार लढतीचा आस्वाद नक्कीच घेता येणार आहे. परंतु ज्यांनी तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या उद्दिष्टाने आगाऊ तिकिटाची बुकिंग करून ठेवली आहेत. ते या माध्यमातून लाखो करोडोंची कमाई करणार आहेत. अशा व्यक्तींवरच मुंबई क्रिकेट असोिएशन तसेच बीसीसीआयचा वचक नसल्याकारणानं मुंबईतील क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईकर मॅचच्या आनंदापासून दूर : भारत-न्यूझीलंड यांच्यात वानखडे मैदानावर होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्या बद्दल बोलताना मुंबईतील क्रिकेट प्रेमींनी सांगितलं की, आम्ही मुंबईचे रहिवासी असून हाकेच्या अंतरावर मुंबई वानखडे स्टेडियम आहे. तरीसुद्धा आम्हाला तेथे जाऊन त्या मॅचचा आनंद स्टेडियमवर घेता येणार नाही. याचं कारण जी मूळ तिकिटांची किंमत आहे त्या दरामध्ये तिकीट मिळणार नाही हे आम्हालाही माहीत आहे. कारण या विश्वचषकाच्या सामन्यासाठी तिकिटांची बुकिंग ही १० ऑगस्ट पासूनच सुरू झाली होती. तरीही ३-४ हजाराच्या तिकिटासाठी २५ ते ५० हजार रुपये, तर कधी लाखोंची मागणी केली जात आहे. वास्तविक वानखडे वरील सामन्याच्या तिकिटांसाठी तिकिटांचे दर हे २ हजारांपासून ते ४५ हजारापर्यंत आहेत. परंतु आता हे दर लाखोंमध्ये पोहचले आहेत. याविषयी बोलताना एका अन्य मुंबईकर क्रिकेटप्रेमींने सांगितलं की, तिकिटांच्या काळाबाजारावर कोणाचाही वचक राहिला नाही आहे. ना मुंबई क्रिकेट असोसिएशन ना बीसीसीआय दोघांनाही याबाबत गांभीर्य नाही आहे. हजारोंची तिकिटं लाखोंमध्ये विकली जाणे कितपत योग्य आहे. क्रिकेटचा चाहता मूळ मुंबईकर यामुळे हौस असूनही स्टेडियमवर जाऊन मॅचचा आनंद घेण्यापासून वंचित राहत आहे.
हेही वाचा -