मुंबई - शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत मी राजकारण सोडणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वचन दिले आहे आणि ते वचन मी पूर्ण करणार म्हणजे करणारचं असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच बाजपच अडचण समजून विधानसभेच्या निवडणुकीत आपण १२४ जागा घेतल्याचेही ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली.
शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही
शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी झाला नसून, सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी झाला आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे शिवसेनेचा आवाज घुमणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही सत्तेत आहोत मात्र, जिथे जिथे सामान्य माणसांच्या हक्काचा प्रश्न आला तिथे तिथे शिवसेना त्यांच्या बाजून उभी राहिली असल्याचे ते म्हणाले.
भाजप-सेना युतीला जनतेनं स्वीकारलं
शिवसेना आणि भाजप यांची विचारधारा एक आहे. म्हणूनच आमची युती झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या बोलणीसाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी झाल्यानंतर युती झाली. भाजप आणि सेनेच्या युतीत वेगळेपण आहे. मागच्या काही दिवसात दोन महत्वाच्या पक्षामध्ये युती झाली. एक म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची युती. आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा या युतीला जनतेने स्वीकारले नाही. मात्र, राज्यात आम्हाला स्वीकारल्याचे ठाकरे म्हणाले.
जागा कमी असल्या तरी आमदारांची संख्या जास्त होणार
आम्ही १२४ जागा घेतल्या असल्या तरी यावेळी आमच्या आमदारांची संख्या वाढलेली दिसेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. वादळ असते तेव्हा शांत राहायचे असते. वादळात आपली पाळमुळं घट्ट करायची असतात. आज मी तेच काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. युतीच्या बाबतीत आम्ही, समजूतदारपणा दाखवल्याचेही ते म्हणाले.
राम मंदीर करावे लागेल
राम मंदीर होणार का? असा प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले, की होणार म्हणजे? राम मंदीर हे करावे लागेल. आपण हिंदुत्ववादी आहोत. राम हा एकवचणी होता. म्हणून राममंदीर करावेच लागेल. मी अयोध्येत गेल्यानंतर राम मंदीराच्या मुद्याला गती आल्याचे ठाकरे म्हणाले.
आदित्यला जनतेनं स्वीकारलंय
बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितले होते की, मी तुला लादणार नाही. तुला शिवसैनिकांनी स्वीकरले तर ठिक. तसेच आदित्यलाही जनतेने स्वीकारले आहे. तो कित्येक पटीने मेहनत करतो आहे. आदित्यला शिवसेनाप्रमुखांकडून बाळकडू मिळाल्याचे ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना भयमुक्त आणि चिंतामुक्त करायचंय
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायचे आहे. आम्ही जनतेला वचननामा दिला आहे. ज्या गोष्टी शक्य होतात त्याच गोष्टी आम्ही वचननाम्यात दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळत असल्याचे ठाकरे म्हणाले.