मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिने आज (रविवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'मला न्याय मिळेल,' अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
ती म्हणाली, आज मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. माझ्यावर जो अन्याय झाला, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मला आशा आहे, की न्याय नक्कीच मिळेल. यामुळे आपल्या देशातील जनता, विशेषत: मुलींचा व्यवस्थेवरील विश्वास बळकट होईल.
तसेच, मी राजकारणी नाही आणि मला राजकारणाशी काही देणेघेणे नाही. माझे नशीब आहे, की राज्यपालांनी मला त्यांच्या मुलीप्रमाणे माझे म्हणणे ऐकून घेतले आणि मला सहानुभूती दिली. म्हणून मला न्याय नक्कीच मिळेल, असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई हे पाकव्याप्त काश्मिर (पीओके) आहे, असे वक्तव्य केले होते. यानंतर तिच्यावर अनेक स्तरांतून टीका करण्यात आली. तर यानंतर कंगनाच्या पाली हिल परिसरातील मणिकर्णिका कार्यालयावर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवला. अवैध बांधकाम असल्याचे म्हणत महापालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयाचा काही भाग पाडला. तर, कंगनाचे कार्यालय हे कायदेशीर आहे. महापालिकेने केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रणौतचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी दिली आहे.