मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या नियोजनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आवेदन पत्र सादर करण्यासाठीच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने आज(सोमवार) जाहीर केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल जुलै महिन्यात जाहीर झाले. परंतु त्यानंतर घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा ऑगस्टमध्ये आयोजित केली जाणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर-२०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यासाठी नियमित, पुन्हा परीक्षेला बसणारे विद्यार्थ्यांना तसेच खासगी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे. त्यासाठीचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हे आवेदनपत्र 20 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भरता येतील. त्यानंतर 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह ते भरण्याची मुभा दिली जाणार आहे. तर, शाळा महाविद्यालयांकडून हे अर्ज बँकेत चलनाद्वारे 3 ते 4 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरण्यासाठीचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. याप्रमाणे परीक्षेत श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर 2020 व फेब्रुवारी मार्च 2021 अशा दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे याची विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
तर, फेब्रुवारी मार्च 2020 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची या परीक्षेतील माहिती ऑनलाईन आवेदन पत्र सादर करताना भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप