मुंबई - महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर काँग्रेस सत्तेत असूनही सामना मुखपत्रातून काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
काय लिहिले आहे सामनाच्या अग्रलेखात?
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक महिन्यापासून बळीराजा आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे. सत्ताधारी भाजपने त्याची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. विरोधी पक्षही बळीराजाची बाजू सरकारजवळ मांडण्यात पूर्णपणे यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत सगळे भाजप विरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाही. राहुल गांधी हे वैयक्तिकरित्या जोरदार संघर्ष करीत असतात. त्यांची मेहनत वाखाणण्यासारखी आहे. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, मायावतींचा बसपा, अखिलेश यादव, आंध्रात जगन यांची वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील चंद्रशेखर राव, ओडिशाचे नवीन पटनायक, कर्नाटकचे कुमारस्वामी, असे अनेक पक्ष व नेते भाजपविरोधात आहेत. पण, ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएत सामील झालेले नाहीत. हे सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाही.
हेही वाचा - कोरोना काळात मुंबईत पार पडल्या 36 हजार 141 प्रसूत्या
वर्षभर झाले काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही
आज वर्षभर झाले काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष आहेत व काँग्रेसचे हंगामी नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत डोलारा चोख सांभाळला आहे, पण त्यांच्या भोवतीचे जुनेजाणते नेते आता अदृश्य झाले आहेत. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासारखे जुनेजाणते पुढारी काळाच्या पडद्याआड गेले. अशा वेळी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यूपीएचे भविष्य काय, हा प्रश्न कायम आहे, असे समनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे.
शिवसेना जाहीरपणे काँग्रेस नेत्यांचा करत आहे अपमान - राम कदम
आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार? असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.
हेही वाचा - कोरोना काळात मुंबईत पार पडल्या 36 हजार 141 प्रसूत्या