मुंबई- सहकारी बँकांकडे 20 हजार कोटी रुपयांचे भांडवल असताना त्यात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार कसा? असा सवाल करत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यावर आणि न्यायालयाच्या निर्णयावर खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्य बँकेच्या कुठल्याही संचालकांचा यात संबंध नसताना, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे जे आदेश देण्यात आले आहेत, त्याचा मला खेद वाटतो. ज्यांनी आक्षेप घेतले त्यांना ऊस कसा येतो, हे माहीत नाही, त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी पुढे आलेले लोक येत्या काळात उघड्यावर पडतील याचा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना जंयत पाटील म्हणाले, न्यायालयाचा निर्णय हा एकतर्फी निर्णय झाला असून त्यात संचालक मंडळाची बाजू ऐकून घेण्यात आली नाही. ज्या सहकारी 27 साखर कारखान्यांना वित्तीय पुरवठा करण्यात आला. तो केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा आणि त्यांच्या परवानगीने करण्यात आला होता. त्यामुळे त्यात काही गैर झाले नाही. यासाठी चौकशा झाल्या आहेत, त्याची माहिती घ्यायला हवी होती. जो वित्त पुरवठा केला, त्याला राज्य बँकेने त्यासाठी राष्ट्रीय इंडस्ट्रियल बीज फायनान्स कॉर्पोरेशन ने मान्यता दिली होती. ते कॉर्पोरेशन नवीन आर्थिक धोरणांमुळे नंतर बंद करण्यात आले. त्यामुळे हा बीज फायनान्स थकला. पुढे त्यासाठी सहकारी बँक म्हणून वित्त पुरवठा करण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने थक हमी दिली होती. त्याची किंमत त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी ठरवली होती. त्यामुळे यात काही किंमत अधिक ठरवली गेली म्हणणे चुकीचे असल्याचेही पाटील म्हणाले.
आम्ही त्यावेळी सर्वपक्षीय लोक होतो. अडसूळसारखे केंद्रीय माजी अर्थमंत्री होते. त्यामुळे गुन्हा दाखल झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर हे होत आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. थकबाकी वसूल केली त्यावर हाय पॉवर समिती नेमली. त्यावेळी सर्व लोकांनी मान्यता दिली. त्यामुळे यात आमचा विक्री व्यवहारात संबंध काय येतो. त्यावेळी विरोधीपक्षामधील लोकांनी आणि गडकरी यांनीही कारखाने घेतले होते. परंतु घेताना राजकीय लोकांनी घेतले म्हणून यावर विषय आला आहे. आता महाआघाडी झाली असली तरी त्यावेळी आम्ही सहकाराच्या व्यवसायात होतो. या व्यवसायात 100 टक्के वसुली होत नसते. आम्ही प्रत्येक वेळी मान्यता घेताना त्यात नाबार्ड, आदी संस्थेचे लोक होते. त्यांनी कधीही हरकत घेतली नाही. यामुळे या प्रकरणातून चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असेही पाटील म्हणाले.