मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देशमुखांवर टिकेची झोड उठली होती. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी क्लिनचिट दिल्यानंतर पहिल्यांदाच देशमुख सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे मी व्यथित झालो आहे, असे त्यांनी ट्वीटकरून सांगितले आहे.
काय म्हणाले आहेत ट्वीटमध्ये -
गेल्या काही दिवसापासून माझावर खोटे आरोप केले गेले. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी व्यथित झालो आहे. कोरोना काळात पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला. त्यात ५ फेब्रुवारीला मलाही कोरोना झाला. त्यानंतर मी नागपूरमधील रूग्णालयात दाखल झालो. ५ ते १५ तारखेपर्यंत मी रूग्णालयात होतो. १५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर खासगी विमानाने मी मुंबईत आलो व होम क्वारंटाईन झालो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्री प्राणायम करत होतो. रूग्णालयात असताना आणि मुंबईत होम क्वारंटाईन असताना व्हीसीद्वारे बैठका आणि कार्यक्रमात सहभागी झालो होतो. त्यानंतर अधिवेशनाच्या कामाला लागलो. त्यावेळी मुंबईच्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा मी घराच्या बाहेर पडलो तेही कामानिमित्त. सध्या काही लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ही माहिती देत असल्याचे देशमुखांनी म्हटले आहे.
देशमुखांवर काय आहेत आरोप
अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता. मुंबईतील बारमधून दरमहा सुमारे 50 कोटी तर इतर माध्यमातून 50 कोटी अशा प्रकारे 100 कोटी वसुलीचे टार्गेट देशमुखांनी दिल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केला होता. या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
गृहरक्षक दलाच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारताच परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सीबीआयकडून भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी सोमवारी सकाळीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांची पाठराखण केली होती. पत्रातील आरोपानुसार उल्लेख केलेल्या तारखेला देशमुख हे नागपुरात होते. त्यामुळे आरोपांत तथ्य नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याचा काहीच प्रश्न नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आता परमबीर सिंगांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या प्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली सह्याद्री अतिथीगृहात गोपनीय बैठक