नवी मुंबई: राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण - २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्रीसदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रम स्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन युद्ध पातळीवर करण्यात आले आहे
५५ वैद्यकीय केंद्रे : या ठिकाणी वैद्यकीय केंद्र आराखाडा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांची उपलब्धता, औषध उपलब्धता, आरक्षित रुग्णालये, वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत देखील मंत्री महोदय पाठपुरावा करत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण ५५ वैद्यकीय केंद्रे असणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खारघर येथील गोल्फ कोर्स येथे ८ हॅलीपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच कॉर्पोरेट पार्क मध्ये भव्यदिव्य अशा स्वरूपाचे स्टेज उभारले जात आहेत. याकरिता ४ ते ५ हजार कामगार गेले ४ दिवस काम करीत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च केला जात असून भव्यदिव्य असा सोहळा पार पडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
स्वच्छता मोहीम राबिवली जात आहे : उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी स्वतः हजर राहून देखरेख करीत आहेत. या ठिकाणी त्यांच्यासाठी वेगवेगळे टेन्ट बांधण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसाठी देखील टेन्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनासह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावली आहे. खारघर परिसरातील ठिकठिकाणी श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम देखील राबिवली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्यामागे १ वैद्यकीय केंद्र : खारघर मधील कार्यक्रमाच्या ठिकाणी ५ सेक्टरमध्ये श्रीसदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्यामागे १ वैद्यकीय केंद्र तर मैदानाच्या शेजारी असलेल्या आमराईत १ वैद्यकीय केंद्र उभारण्यात आले आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रासाठी ४ डॉक्टर, २ नर्स, २ औषध निर्माता, १० स्वयंसेवक अशा प्रकारे एकूण १२८ डॉक्टर, ६४ नर्स व ३२० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१० आय.सी.यू खाटा राखीव: सेक्टर ५ येथे १० तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. ३२ वैद्यकीय केंद्रांवर औषधांचे ३२ किट ठेवण्यात आलेआहेत. या प्रत्येक किटमध्ये आवश्यक अशा ८ त्यापैकी ३२ रुग्णवाहिका असून त्या ३२ वैद्यकीय केंद्रांवर तैनात ठेवण्यात येतील. २ रुग्णवाहिका पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. १४ रुग्णवाहिका कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ७ अतिदक्षता वैद्यकीय केंद्राच्या ठिकाणी आणि ७ आमराईच्या ठिकाणी आहेत. ५ कार्डियाक रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आले आहेत.
मास्क लावणे अनिवार्य आहे: नवी मुंबई आणि पनवेल मधील एमजीएम, रिलायन्स, फोर्टिस, अपोलो सारख्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० साध्या आणि १० आय.सी.यू खाटा राखीव ठेवल्या आहेत. साध्या रुग्णालयांनसाठी २५ टक्के खाटा आरक्षित आहेत. वाढत्या तापमानात उन्हाळ्याच्या झळांमुळे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या जनतेला डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुबलक पाणी आणि ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हेही वाचा: प्रशांत दामले वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांना झी नाट्यगौरव तर्फे मानवंदना