मुंबई - जोगेश्वरीच्या जनता जागृती मंचाने सामाजिक बांधिलकी जपत 'एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची, उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवारी धुलिवंदनाच्या दिवशी रस्त्यावर राहणाऱ्या गरीब गरजू मुलांना पुरणपोळीचे वाटप करून आपली संस्कृती सामाजिक भान राखून जपण्याचा प्रयत्न केला.
ही संघटना मागील ६ वर्षापासून हा उपक्रम राबवते. आज हा उपक्रम जोगेश्वरी पुरती सीमीत न राहता मुंबईतील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. अनेक मंडळे, सामाजिक संस्था आपल्या विभागात हा उपक्रम राबवून या मुलांच्या चेहऱ्यावर काही वेळ हास्य आणि आनंद देत आहेत.
या मुलांसोबत रंग उधळून गुरुवारी होळी साजरी करण्यात आली. त्याचसोबत खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणही देण्यात आले. जनता जागृती मंचाची ही संकल्पना घराघरात पोहोचली असून नागरिक स्वतः हा उपक्रम आपल्या सोसायटीत राबवत आहेत. हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याची भावना जनता जागृती मंचाच्या सदस्यांनी व्यक्त केली.