मुंबई - वाढत्या कोरोना संसर्गामुळे कालपासून(रविवार) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये होळीचा सण साजरा होत आहे. परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून होळी साजरी करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. नागरिकांनी मात्र, कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. माहीम कोळीवाडा परिसरामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लोकांनी होळी साजरी केल्याचे समोर आले.
पोलिसांच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन -
होळीच्या उत्सवानिमित्त लोकांनी गर्दी न करता होळी साजरी करावी, अशी विनंती शासन आणि प्रशासनाने केली होती. मात्र, नागरिकांनी याला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते. मुंबईच्या माहीम कोळीवाडा परिसरामध्ये होळी साजरी करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. त्यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून होळी साजरी केली. या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस हजर असताना देखील कारवाई झाली नाही. जेव्हा माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला त्यावेळी पोलिसांनी हा गोंधळ थांबवला.
राज्यात सापडले ४० हजार कोरोनाबाधित -
राज्यात काल (28 मार्च) 40 हजार 414 नवीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 27 लाख 13 हजार 875 वर पोहोचली आहे. तर, 108 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.