मुंबई - नाणारच्या मुद्यावर आक्रमक होत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही सत्ता सोडून देण्यासाठी तयार असून राजीनामे खिशात असल्याचे वक्तव्य केले होते, मात्र आज युतीची घोषणा करताना स्वबळाची तलवार म्यान करता राजीनामे खिशातच राहिले. हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावर आम्ही भाजपसोबत युती करत आहे. संभाव्य टीकेला उत्तर देणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बहुचर्चित युतीची घोषणा करण्यात आली. युतीचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेवर एक होण्याची वेळ आली आहे. पुढच्या काही दिवसातल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईलच.
याशिवाय राम मंदिराच्या मुद्यावर ही युती 25 वर्ष टिकली होती, त्याला हिंदुत्वाची धार होती. काही मुद्यांवर आता मुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विधानसभेत जागावाटप सम-समान असेल. भाजप आणि शिवसेनेचे नाते सर्वांसमोर आहे, आम्ही जवळीकता आणि संघर्ष दोन्ही पाहिला आहे. काही मतभेद असतात, पण गेली ५० वर्ष ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांना आत लाभ द्यायचा का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. युतीच्या निर्णयानंतर माझ्यावर टीका होईल, पण मी त्याला उत्तर देईन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. नाणारच्या मुद्यावर जनतेच्या विचारानेच सरकार निर्णय घेणार आहे. ज्यांना ज्या ठिकाणी हा प्रकल्प हवा आहे, त्या ठिकाणी तो प्रकल्प उभारावा, असेही ठाकरे यांनी सांगितले. तमाम हिंदू या क्षणची वाट बघत होता, ना आम्ही एक दिलाने आता पुढे जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आग्रही आहेत, त्यांचे म्हणणे आम्ही ऐकले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच योजना राबवू. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ तसेच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र यावेत, अशी जनभावना होती. या भावनेचा आदर राखत लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३, तर भाजप २५ जागा लढवणार आहे. त्याचबरोबर विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या वाटून घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही लोक एकत्र येऊन संभ्रमाची स्तिथी निर्माण करत आहेत, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाने एकत्र यावे, ही यामागची भूमिका आहे. गेल्या विधानसभेत काही मतभेद झाले.पण त्यापूर्वी २५ वर्ष ही युती टिकून राहिली, याचाही विचार होणे आवश्यक आहे. दोन्ही पक्ष समान हिंदुत्वाच्या विचार सरणीचे आहेत. केवळ सत्तेसाठी जागा वाटप नाही तर व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने एकत्र आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही युतीला महत्वपूर्ण योगदान दिल्याबाबत उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभार मानले. दोन्ही पक्षात मतभेद होते, ते या क्षणाला संपले असल्याचे शहा यांनी यावेळी जाहीर केले. या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.