मुंबई - सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊ भारत-पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांवर चांगलाच भडकला आहे. याप्रकरणी त्याने सोशल मीडियावरून टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. खार पोलीस ठाण्यात त्याने ही तक्रार दिली.
काय आहे प्रकार?
सध्या युएईमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. यात भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर काहींनी भारताच्या पराभवावर फटाके फोडत जल्लोष साजरा केला. एक व्हिडिओ शेअर करत मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने भारतीय क्रिक्रेटर्सवर टीका केली होती. तसेच त्याचा पाकिस्तानला पाठिंबा असून मुंबई पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाही असे, तो म्हणाला होता. यानंतर आता हसन कोटीविरोधात हिंदुस्तानी भाऊने खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - नवाब मलिकांचे आरोप बेछूट, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील - भाजप नेते चंद्रकांत पाटील
हिंदुस्तानी भाऊ काय म्हणाला -
याच देशात खाऊन, जर पाकिस्तानचं कौतुक करत असाल, तर पाकिस्तानमध्ये जा. तुमचे या देशात काय काम आहे. ही लोक पाकिस्तानचा विजय झाला म्हणून खूश झाली नसून यांना भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे. अनेक ठिकाणी या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. या लोकांना वेळेवर उत्तर देणे गरजेचे आहे. भारताच्या पराजयावर आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही तो म्हणाला. तसेच लवकरात लवकर देशाविरोधात आणि हिंदुंविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच अशा लोकांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला.