मुंबई Mumbai High Court : पतंजली फूड लिमिटेड कंपनी 2006 पासून 'तुलसी गोल्ड' हा ट्रेडमार्क वापरत असून या ट्रेडमार्कच्या आधारे सोयाबीन तेल विक्री केलं जातंय. परंतु एस इ ऑइल प्रोडक्ट यांनी 2008 मध्ये 'तुलसी गोल्ड' नावानं व्यवसाय सुरू केला. त्यासाठी नोंदणीसाठी अर्ज केला. परंतु भारतीय ट्रेडमार्क कार्यालयानं त्यावर आक्षेप घेतला. तरी देखील एस इ ऑइल लिमिटेड कंपनीनं त्याचा वापर सुरू ठेवला. हा प्रकार लक्षात येताच 'पतंजली'नं त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.
पतंजली फूड यांचा दावा : 'पतंजली'ची बाजू ज्येष्ठ वकील प्रथमेश कामत यांनी मांडली. त्यांनी सांगितलं की, तुलसी गोल्ड ट्रेडमार्क 2006 पासून पतंजली फूड लिमिटेड वापरत आहे. त्याची त्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळं त्यावर त्यांचाच हक्क आहे. परंतु, प्रतिवादी कंपनी एस इ ऑइल प्रोडक्ट लिमिटेड यांनी 2008 मध्ये त्या नावावर नोंदणीसाठी अर्ज केला. 2015 ला त्यांनी अर्ज मागे घेतला. तसंच 2016 ला त्यांचा अर्ज ट्रेडमार्क रजिस्ट्रीनं फेटाळून लावला होता. तरी देखील त्यांनी ती चूक करत 'तुलसी गोल्ड' नावानं सोयाबीन तेल विक्री केलं.
एसई ऑईल प्रायव्हेट लिमिटेडची बाजू : प्रतिवादी एस इ ऑइल प्रोडक्टच्या वतीनं कोणतीही नक्कल करीत नसल्याचा दावा करण्यात आला. तसंच आम्ही सर्व व्यापाराचे नियम पाळत सोयाबीन ऑइल विक्री करत असल्याचंही ते म्हणाले.
न्यायालयानं आदेशात नेमकं काय म्हटलंय : दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर आय छागला यांनी निर्णय दिला. ते म्हणाले की, 'तुलसी गोल्ड' ट्रेडमार्क 2006 पासून 'पतंजली' वापरत आहे. त्यामुळं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं त्याची नक्कल करणं, त्याचा वापर करणं तत्काळ थांबवावं. तसंच एस इ ऑइल प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं तयार केलेला सोयाबीन माल तत्काळ जप्त करण्यात यावा, असे आदेशही उच्च न्यायालयानं दिलेत.
हेही वाचा -
- आता दहा कोटी रुपये किंमतीपेक्षा अधिकच्या खटल्यांवरच मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी, विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
- Mumbai High Court : तब्बल 18 वर्षानंतर जवानाच्या कुंटुंबाला न्याय, वृद्ध आई-वडिलांना नुकसान भरपाई
- धबधब्यावर आता पोलीस ठेवायचे का ; जनहित याचिकेत सोशल माध्यमावरची अविश्वासार्ह माहिती, उच्च न्यायालयाचा संताप