मुंबई High Court On Gujrat Road : गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते गुळगुळीत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं. मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) नाशिकच्या मंजुळा विश्वास यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेतना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलं. महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा चांगले असल्याचंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आपलं लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं यावेळी दिले.
खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या जीविताला धोका : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग 160 या महामार्गावरून दुचाकी आणि चार चाकी वाहनांना प्रवास करणं अत्यंत कठिण झालं आहे. मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन तीन तासाचा प्रवासापेक्षा खूप मोठा कालावधी लागतो. परिणामी वाहन प्रदूषण होऊन इंधन भरपूर खर्च होते. शिवाय रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका देखील असल्याचं याचिकाकर्त्या मंजुळा विश्वास यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं होतं.
इगतपुरी कसारा रोड जीवघेणा : मुंबईवरुन निघाल्यावर ठाणे आणि इगतपुरी कसारा हा रस्ता एकत्र होतो. मात्र तिथं या रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची अधिक दाट शक्यता आहे. जिथं हा रस्ता जुळतो, तो रस्ता अत्यंत जीवघेणा बनला असल्याचं याचिकाकर्त्या मंजुळा विश्वास यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. खड्ड्यांच्या संदर्भात देखरेख करण्यासाठी शासनानं टोलनाके उभारलेले आहेत. प्रत्येक वाहनाच्या मागे 120 रुपये टोल वसुल करण्यात येतो. तरीदेखील रस्ते खड्डे मुक्त झाले नसल्याचं या याचिकेत स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना हे रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती या याचिकेतून न्यायालयाला करण्यात आली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले निर्देश : नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे उच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलं. यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना विचारणा केली. 'नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गाबाबत याचिकाकर्त्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या महामार्गाची दुर्दशा झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले असून अपघात होण्याचा धोका आहे. आपण टोल वसुली करुनही रस्ते असे का ? याबाबत आपले लेखी म्हणणं पुढील सुनावणीत मांडण्यात यावं', असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
हेही वाचा :