मुंबई - कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आधीच लांबलेल्या निवडणुका अधिक काळ थांबवणे योग्य नाही, आता सर्वांनाच कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असे म्हणत पुन्हा हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका अधिक काळ थांबवता येणार नाहीत आपल्याला आता कोरोना सोबत जगायला शिकायला हवे असे स्पष्ट केले.
त्यामुळे आता या निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने अखेर संचालक मंडळाने यासंदर्भात दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली. कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 2 फेब्रुवारीला सहकारी संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढून गोकूळच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले होते.
निवडणुका आणखी थांबवता येणार नाहीत
राज्य सरकारने 24 फेब्रुवारीला नव्याने अध्यादेश काढून 31 मार्चपर्यंत सर्व निवडणुकांना पुन्हा स्थगिती दिली. मात्र, जिल्हा उपनिबंधकांनी गोकूळच्या निवडणुका थांबणार नाही त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरवलेल्या काळात घेतल्या जातील, असे स्पष्ट करत निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याविरोधात गोकुळच्या संचालकांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार या निवडणुकांना स्थगिती द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. यावर आज खंडपीठाने यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असेल तर आता निवडणुका आणखी थांबवता येणार नाही, अशी भूमिका घेत याचिका फेटाळण्याचे संकेत दिले. त्यामुळे अखेर गोकूळने याचिका मागे घेतल्याने आता या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.