मुंबई - लालबाग येथील साराभाई इमारतीत सिलेंडरचा स्फोट होऊन 16 जण जखमी झाले होते. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सिलेंडरचा झाला होता स्फोट -
लालबाग गणेश गल्ली येथे सुप्रसिद्ध अशी साराभाई इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर 6 डिसेंबरला सकाळी 7 वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या घरात रात्रीपासून गॅस गळातीचा वास येत होता. सकाळी लग्नापूर्वी हळदीचे जेवण बनवण्यासाठी कामगार आणि लग्न घरातील काही लोक आले, त्यांनी गॅस पेटवल्यावर स्फोट होऊन आग लागली. या स्पोटात इमारतीमधील काही घरांचे नुकसानही झाले.
16 जण झाले होते जखमी -
या दुर्घटनेत इमारतीमधील 16 रहिवाशी भाजले होते. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले हाेते. आगीमध्ये भाजलेल्या जखमींना जवळच्या केईम रुग्णालयात दाखल करण्यात होते. त्यापैकी 12 जणांना केईएम रुग्णालयात, तर 4 जणांना भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात पाठवण्यात आले. केईएममध्ये 6 रुग्ण 70 ते 80 टक्के भाजल्याने, तर मसिनामधील 4 जण 70 ते 90 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर 6 जण 30 ते 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
16 पैकी दोघांचा मृत्यू -
केईएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्यापैकी सुशीला बागरे (62) या महिलेचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला होता. तर करीम (45) हा 30 ते 50 टक्केच भाजला होता. त्याची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु त्याचाही मध्यरात्री मृत्यू झाला. सध्या केईएम रुग्णालयात 5 व मसिना रुग्णालयात 4 अशा एकूण 9 जणांची प्रकृती गंभीर असून 3 जणांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार