मुंबई Help For Female Shooter : मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खेळाडूंना मदतीचा हात देऊन आपली सकारात्मकता सिद्ध केली आहे. नेमबाजीमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये चमक दाखवणाऱ्या एका महिला पोलीस खेळाडूला राज्य सरकारने तातडीने मदतीचा हात दिला आहे.
कामगार मंत्र्यांनी केली शिफारस : सांगली जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेली स्नेहल सुतार ही महिला खेळाडू नेमबाजी आणि योगासने या प्रकारामध्ये निपुण आहे. राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत तिने सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. अशा विविध स्पर्धांमध्ये सुमारे 40 पेक्षा अधिक पदके तिने आपल्या नावावर केली आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई किंवा ऑलिंपिक स्पर्धांसाठी जायचं असेल तर त्यासाठी चांगली रायफल आणि नियमित सराव आवश्यक आहे. स्नेहल सुतार हिच्याकडे सराव करण्यासाठी स्वतःची रायफल नाही तर रायफल विकत घेण्याची तिची ऐपतही नाही. त्यांनी आतापर्यंत मिळवलेलं यश आणि चिकाटी पाहता तिला राज्य सरकारने मदत करावी यासाठी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी तिची क्रीडामंत्री संजय बनसोड यांच्याशी भेट करून दिली.
राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत : मंत्री सुरेश खाडे यांनी स्नेहल सुतार हिने मिळवलेली पदके आणि तिची कामगिरी क्रीडामंत्री संजय बनसोड यांच्या नजरेस आणून दिली. तसंच तिला रायफल घेण्यासाठी असलेली अडचणही सांगितली. याबरोबर संजय बनसोड यांनी ताबडतोब स्नेहल सुतार हिला रायफल विकत घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच अधिक मदत लागल्यास स्वतः वैयक्तिकरीत्या मदत करण्याचं आश्वासनही बनसोड यांनी यावेळी दिलं.
स्नेहल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार : आशियाई अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याकडे सराव करण्याकरता स्वतःची रायफल नव्हती. राज्य सरकारने दिलेल्या या मदतीच्या जोरावर आता आपण रायफल घेणार असून नियमित सराव करू आणि आशियाई तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या राज्याचा नावलौकिक करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी स्नेहल सुतार हिने दिली.
हेही वाचा: