मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा सामना करणाऱ्या मुंबईसमोर आता पावसाळ्याचे संकट उभे राहिले आहे. पावसाळ्यात इतर संसर्गजन्य रोगांसोबत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या बोरिवलीच्या गणपत पाटील नगरमध्ये 'मिशन झिरो' अंतर्गत हेल्मेटद्वारे नागरिकांचे स्क्रिनिंग करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री, आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार 'मिशन झिरो' या मोहिमेअंतर्गत हेल्मेटद्वारे चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये कमी वेळात जास्त लोकांचे स्क्रिनिंग करण्यात येते. हेल्मेटवर असलेल्या सेन्सर्सच्या माध्यमातून समोर उभ्या असलेल्या अनेकांचे तापमान याद्वारे मोजले जाते. एका अॅपद्वारे हेल्मेट परिधान केलेल्या डॉक्टरच्या मोबाईलवर समोरील व्यक्तीला ताप आहे की नाही हे समजते. त्यासाठी थर्मल गनची आवश्यकता नसते. फिजिकल डिस्टन्सिंग राखून ही तपासणी केली जाते.
दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत पाटील नगरात ही चाचणी घेण्यात आली. या तपासणीमुळे कमी वेळात रुग्णांना शोधणे शक्य होणार आहे. यापूर्वी सेरो सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगोलीक फैलाव समजून घेण्यात आला होता.
दरम्यान, सर्दी, खोकला व ताप या साथीच्या आजाराला न घाबरता नागरिकांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन घोसाळकर यांनी केले. आजच्या सर्वेक्षणाला माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, पालिकेच्या डॉ. वंदना शेळके, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, ज्यूडी मेंडोसा व जतीन परमार उपस्थित होते.