मुंबई- जून महिना संपत आला तरी मुंबईत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाऊस कुठे गायब झाला, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मात्र, अशावेळी मुंबई हवामानखात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याच्या भाकिताने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत उद्या, परवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय, अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अनुभव घेता येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह मुंबईत पुढिल काही दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पण, अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला नाही. भारतीय हवामान खात्याने पुढच्या ५ ते ७ दिवसांसाठी पावसाचे पूर्वानुमान दिले आहे. पश्चिम किनार पट्टीवर पाऊस सक्रीय झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या २४ तासात दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही स्थिती पुढिल तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रभाव आजपासून उत्तर कोकणातही दिसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईत २४ ते ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता
मुंबई, पालघर, ठाणे या भागात २४ तासात अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस मुंबईत पाऊस चांगला राहिल. २८ आणि २९ या दोन दिवशी मुसळधार पाऊस पडेल असे हवामान खात्याचे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.