मुंबई/ठाणे - अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी कोकणाला तडाखा दिला. यात रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. कोकणातला जोर ओसरल्यानंतर वादळाने मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये देखील नुकसान केले. आज ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ठाण्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी फ्लॉवर वेली आणि मुख्य बाजार पेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात झाडे पडली. वेली येथे झाड पडल्याने एका चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यानेल परिसरास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यात पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सखल भागात साजलेले पाणी काढण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडक दिली. मुंबई आणि ठाण्याला वादळाचा तडाखा वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी बसला. पण, रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यात विजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत ३७ ठिकाणी झाडांची पडझड, तर 10 हजार 840 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
हेही वाचा - मुंबईला 'निसर्गा' चा फटका, येत्या २४ तासात शहर व उपनगरात जोरदार पावसाची शक्यता