मुंबई - भारतीय हवामान विभागाने आज (शनिवार) मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. आज सकाळी समुद्राला मोठी भरती असल्याने मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या सर्व २४ विभाग कार्यालयांसह अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यातच समुद्राला सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती आहे. मोठ्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचते व आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना 'हाय अलर्ट' देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे पंप कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अग्निशमन, एनडीआरएफ, नौसेना सज्ज -
बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे.
वीज, मोबाईल कंपन्या सज्ज -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या 'बेस्ट' उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे एसएमएस पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापन -
मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्यात आला आहे. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी मुंबई पोलीस दल, महापालिकेचे मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या विविध यंत्रणाचे समन्वय अधिकारी, मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
शाळांमध्ये तात्पुरते निवारे -
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यकतेनुसार क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था 'एल' विभागाच्या 'एल' विभागा मार्फत करण्यात येणार आहे. यापूर्वीच निर्धारीत करण्यात आल्यानुसार महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या मनपा शाळा त्वरीत मदतीकरिता सुसज्ज करण्यात आल्या आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई : कुलाबात 160 तर सांताक्रूझमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद, अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी
हेही वाचा - पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज